MEDIA VNI
अतिवृष्टी नुकसान भरपाईची 10 कोटी रक्कम थेट बँक खात्यात जमा.!
- हेक्टरी १० हजार प्रमाणे अतिरिक्त अनुदानास मंजुरी.!
मीडिया वी.एन. आय :
गडचिरोली, दि . ५ : अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा देत जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी प्राप्त सुमारे २९ कोटी रकमेपैकी १० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये इतकी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला आहे.
मदतीचा तपशील आणि अतिरिक्त निधीला मंजुरी
जून ते सप्टेंबर २०२५ या पहिल्या टप्प्यात एकूण २१ हजार ४९५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यासाठी पहिल्या टप्प्यातील १५ कोटी ६३ लाख १२ लाख रुपये निधी प्राप्त झाला असून त्यापैकी १५ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या खात्यात रु. १० कोटी १८ लाख ७८ हजार रुपये इतका निधी थेट जमा करण्यात आला आहे. याचबरोबर शासनाने प्रति हेक्टरी रु. १० हजार याप्रमाणे अतिरिक्त अनुदान देण्यास दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी सध्या १३ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. तर आक्टोबर २०२५ मधील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ६२१ शेतकऱ्यांचे प्राथमिक अंदाजानुसार सात हजार पंचेचाळीस हेक्टरवरील शेत पिकाचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात येत आहे.
जमा न झालेल्या रकमेसाठी तात्काळ संपर्क साधावा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
"ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा झाली नसेल, त्यांनी विलंब न लावता तातडीने संबंधित तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. बँक खात्यात काही तांत्रिक त्रुटी असल्यास किंवा बँक खाते नोंदीत नसून निधी परत गेला असल्यास, त्वरित आवश्यक कार्यवाही करून घ्यावी. निधी मिळण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील," असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
An amount of 10 crore for flood damage compensation has been directly deposited into the bank account!
